Sunday 31 March 2013

ये आवाज ही पहचान है.....



आकाशवाणी पुणे,  भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...... 
हा स्वर आकाशवाणीच्या बातम्या ऐकणारया अनेकांना अगदी परिचयाचा आहे. अनेकांना तर मध्यरात्री झोपेतून उठवून जरी कोणी विचारलं की हा आवाज कोणाचा तर सहज उत्तर येईल भालचंद्र जोशी. बरेच जणांच्या घरी पहाटे पाच वाजता रेडिओ सुरू होतो, मग तो आई, आजी-आजोबा, वडील कोणीतरी सवयीने आपसूकच सुरू करत असेल. घरातील तरुण मुलं झोपली असतील तरीही त्यांना आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण ऐकावं लागतं कारण आईची तेवढीच हौस किंवा वडिलांचा नियम म्हणून. याच प्रसारणात हा दमदार पण प्रेमळ असा स्वर सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी कानावर पडायचा.
 उभ्या महाराष्ट्रात आकाशवाणी पुणे असं कोणी म्हटलं तर समोरच्याच्या तोंडातून नकळतच पुढचं वाक्य बाहेर पडायचं भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. जणू ती प्रतिक्षिप्त क्रियाच झाली होती. एखाद्या रेडिओ जिंगलचं कसं असतं ती पाठ करावी लागत नाही ती रोज ऐकून आपोआपच पाठ होते. आपण ती पूर्ण कुठेही न अडखळता वर्षोनुवर्षे म्हणून दाखवू शकतो, तसं भालचंद्र जोशींच्या वृत्तनिवेदनाचं आहे. त्यांचं बातम्या देणं लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलं आहे. भालचंद्र जोशी बातम्या देताहेत म्हटलं की प्रत्येकजण सावरून बातम्या ऐकायला बसायचा, कारण ते नुसतं ऐकणं नव्हतं. तो एक संस्कार होता भाषेचा, वाचनाचा. शाळेत जाणारी मुलं-मुली, शेतकरी, व्यावसायिक, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, नोकरदार, गृहिणी सगळ्यांनाच त्यांच्या आवाजात आपुलकी जाणवायची, कितीही अवघड बातमी सोपी वाटायची आणि समजायची. अर्थात, आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातील इतर सगळ्या सहकारी आणि संपादकांच्या तसंच वार्ताहरांच्या कष्टांचं प्रत्यक्ष रूप म्हणजे ते वार्तापत्र होतं. भालचंद्र जोशी त्यांची मांडणी उत्तम करायचे. वार्तापत्र कसं वाचावं, स्पष्ट आणि शुद्ध उच्चार कसे असावेत, कुठं थांबावं, दु खद बातमी कोणत्या स्वरात वाचावी, नवी बातमी कशी सुरू करावी, आवाज कसा असावा, कुठं श्वास घ्यावा याचा अचूक परिपाठ म्हणजे भालचंद्र जोशींचं वाचन. महाराष्ट्रभर ओळख निर्माण केलेल्या या वृत्तनिवेदकाचा सहवास आम्हाला मिळाला, त्यांच्याकडून प्रशिक्षणही घेता आलं. 31 मार्च 2010 ला जोशी सर आकाशवाणीच्या नोकरीतून निवृत्त झाले. आज त्याला तीन वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे त्यांनी त्या दिवशी दिलेले वार्तापत्र पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसाठी...






 


 अमोल आगवेकर 
तांत्रिक सहाय्य अनिकेत कोनकर, विहंग घाटे.


Sunday 10 February 2013

ओळख प्रेमाची

प्रेमाची गोष्ट । दोन प्रसंग 

प्रेमाची गोष्ट हा चित्रपट आमच्या पाहण्यात आला. त्यावरून आम्ही दोन प्रसंग नव्याने चित्रित केलेले आहे. (म्हणजे त्याचे चित्रीकरण करण्याचे डोक्यात आहे. निर्माता मिळाला की ते मार्गी लावू)

प्रसंग एक (अर्थात काल्पनिक । साम्य आढळल्यास योगायोग समजावा वगैरे वैगेरे..)

'' जानू , तू असं का बोलतोस ? खरच माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं आहे का माझ्यावर प्रेम ? तुला कोण ती पीयू आवडते असं तू मला सांगितले होतेस. ते खरंय का ? सांग न जानू मला.'' - अनु
''अगं तसं नाही अनु. मला तूच खूप आवडतेस. म्हणजे ती ही आवडते. पण...?? '' - जानू अडखळला आणि त्याने विषय बदलला.
जरा just dial ला फोन करून विचार ना, मंगला थिएटरला कोणता पिक्चर आहे साडेपाच ला...

अनु लगेच ८८८८८८८८८८ डायल करते आणि मेसेजची वाट पाहते.
'' ऐ 'प्रेमाची गोष्टं'य जानू... खूप ऐकलंय रे मी याबद्दल. जाऊया का ? ''

जानू - हो.
 दोघेही जातात.
पिक्चर सुरु झाल्यावर दोघेही कुणालातरी मेसेज पाठवतात त्याचा आशय साधारण असा असतो
' मी जरा कामात बिझी आहे. फोन करू नकोस. मी फ्री झाल्यावर फोन मारतो.' वगैरे वगैरे.....

पिक्चर संपेपर्यंत दोघांनाही कुणाचाच फोन येत नाही.
हे एक बर झालं.
जानू गाडी काढतो. अनु गाडीवर मागे बसते.
दोघेही शांत.
जानू गाडी वेगात न्यायला लागतो आणि अनु ही तितक्याच वेगात एक वाक्य टाकते.
'' जानू तुला काय वाटतं आपल्या प्रेमाबद्दल? "
जानू गंभीर. ऐन थंडीत त्याला घाम.
'' असं काय विचारतेस? ''  जानू
मला वाटतंय आपण थांबू.
जानू गाडी थांबवतो.
'' काही खायचं का तुला ? '' जानू
तसं नाही रे आपण नातं थांबवू या का? - अनु
अनु पुढे बोलत राहते
''मला माझ्या ख-या प्रेमाकडे जायचंय. तू आधी भेटला म्हणून तुझ्यावर प्रेम केले. पण एक जण नंतर भेटला. भानू त्याचे नाव. तोच मनात आहे माझ्या. पण प्रेमाची गोष्ट पाहून....''
हे ऐकून जानूचा घाम वाळला.
'' खरं तर मला पीयूच आवडते तुझ्यापेक्षा. पण तू माझ्यावर प्रेम करतेस असं समजून मी इतके दिवस थांबलेलो. ठीके तू जा भानूकडे.. मी जातो पीयूकडे...'' एवढे जानू बोलतो आणि तितक्यात त्याला पीयूचा फोन येतो.
पीयूला अनुची स्टोरी माहीत असतेच.
'' हॅल्लो पीयू, मी आत्ताच अनुसोबत प्रेमाची गोष्ट पहिला. आणि मला जाणीव झाली  की तूच माझं खरं प्रेम आहेस. मी तुझ्याशी खोटं बोललो मगाशी. पण समजून घे. आता मी तुझाच आहे.''

अनु ही भानूला मेसेज टाकते ' प्रेमाची गोष्ट कधी पाहायला नेतोस मला?'
भानू उतावीळ. लगेच रिप्लाय '' रात्री साडे नऊची तिकिटे काढतो लगेच पाहू...''
अनु चा रिप्लाय '' ''
---------------

प्रसंग दोन ( हाही
काल्पनिकच बरं का..)

'' अरुण चल ना रे, आपण आपले प्रेम घट्ट करू...''
''असं काय करतेस करुणा, प्रेम काय नट बोल्ट आहे काय ? सैल झाला की घट्ट करायला.'' - अरुण
'' जाऊ दे बाबा, तुला काय कळणार माझं कवित्व..'' - करुणा
'' अले कलुना.. ऋत्ली वाटतं... काय कलायतं आता..'' - अरुण बोबडं बोबडं बोलला, सैल झालेलं प्रेम घट्ट व्हावं म्हणून.
पण करुणा अजूनच चेहरा फिरवून बसली.
'' ऐ ऐक न.. ऐक न...'' - अरुण
करुणाने तिचा चेहरा आणखी ४५ डिग्री मध्ये फिरवला. आणि अरुणकडे पाठ केली.

पिक्चर हा करुणाचा वीकपॉईंट
अरुणने उगाच काही तरी आठवल्यासारखं केलं. आणि स्वत: च पुट्पुटला - प्रेमाची गोष्ट मंगलाला साडेपाच वाजता आहे.

हे वाक्य ऐकल्यावर करुणाने reverse gear टाकला. आपला प्रेमाचा नट  लूज झाला होता ते विसरूनच गेली. म्हणाली जाऊया ना...
अरुणने गाडी काढली. करुणा पाठीमागे बसली. दोघांमध्ये बोलणे नाहीच. फक्त तिचा त्याच्या खांद्याला स्पर्श आणि त्याच्या खांद्याला तिच्या हाताचा स्पर्श.
स्पर्शाचाच संवाद.
पिक्चर सुरु झाला. आणि अरुणला अतुल म्हणजे आपणच आणि करुणाला सागरिका म्हणजे आपणच असं वाटायला लागलं.

दोघंही एकमेकांच्या पुन्हा प्रेमात बुडाले.

पिक्चर संपला तेव्हा सैल झालेला नट घट्ट झाला होता.

----------------
  
अभिजित